Home > परिचय
आपलं प्रत्येकाचं एक गाव आहे. त्याची संस्कृती आहे. वेगळेपण आहे. ते जगाला सांगायला हवं. इतरांच्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. खूप समस्या पण आहेत. आपण सोडवू शकलो तर उत्तमच. पण निदान त्या आपल्याला माहित तर असायला हव्यात. कदाचित संबंधित माणसांपर्यंत आपण त्या पोचवू शकू.  तुकारामांच्या शब्दात “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ”
हे सगळं यासाठी की बरेच लोक विचारतात आम्हाला पण काहीतरी करायचंय. शेतीसाठी. शेतकऱ्यासाठी. गावातल्या शाळेसाठी. मदत करायची आहे. कशी करू? मुळात ही मदत नाही. आपलं अन्न पिकवण्यात आपला सहभाग आहे. आणि कुणी पैसे द्यावेत ही मुळीच अपेक्षा नाही. दहा झाडं लावली तरी ती सगळ्या देशासाठी मोठी कामगिरी आहे. गाडी थांबवून एखाद्या शेतकरी कुटुंबाशी प्रेमाने गप्पा मारल्या तरी खूप आहे. मुळात आपलं एकमेकांचं गाव समजून घेतलं तरी खूप आहे. कारण पैसे पुरत नसतात कधीच. झाडं मात्र पिढ्यानपिढ्या जगतात. छोटे छोटे तळे, तलाव बनवता येऊ शकतात. शेतकऱ्याकडे जाऊन थोडी जास्त किंमत देऊन धान्य खरेदी करता येऊ शकतं. देण्या घेण्याचं जाऊ द्या. एकमेकांचं सुख दुखः समजून घेणं हे सुद्धा काय कमी आहे? आणि माणसं फक्त वाचतात असं नाही, मनातून पटलं की अडी अडचणीला पोचतात पण. अशी माणसं एकत्र यावीत म्हणून हा सगळा खटाटोप.
error: Content is protected !!