Home > सामाजिक > “मधुकर सिताराम जाधव. वय ७६. दुकान न्यू हेअर सलून (स्थापना १९५८) पंचमुखी मारुती रोड, सांगली.”

‘ठेविले अनंते तैसेची रहावे’
असं प्रत्येकवेळी म्हणून चालत नाही. दाढी जर व्यवस्थित येत नसेल किंवा आपल्याला दाढी व्यवस्थित दिसत नसेल तर दाढी करावीच लागते त्याशिवाय चित्ती समाधान असु शकत नाही. ‘मुलं मोठी होतात आणि त्यांना पंख फुटतात’ असं लहानपणी ऐकलं होतं. पण मला पंख फुटले नाहीत. मला दाढी आली. आणि दाढी करणं माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक कधी बनून गेला कळलंच नाही. तसं मी नेहमी घरीच दाढी करतो. पण यावेळी उगाचच बाहेर दाढी करावी असं का कुणासठाऊक वाटलं. म्हणजे मी कधीच बाहेर दाढी करत नाही असं ही नाही. पण शक्यतो नाई करत. ज्याच्याकडं केस कापतो त्याच्याकडं दाढी करायचं ठरवून मी आणि मित्र निघालो. डोक्यात विचार आला की आज रविवार म्हणजे सलूनमध्ये गर्दी असणार. उगाचच थांबायला लागणार, तासाभरात गाडी आहे. घरीच केली असती तर बरं झालं असतं म्हणून स्वतःवर चिडचिड झाली. आता दिसेल त्या दुकानात दाढी करु म्हणून दुकान शोधू लागलो. जाताजाता एक दुकान दिसलं. दुकान इसवीसन पुर्व काळातलं वगैरे होतं. चार खुर्च्या, सगळ्या ड्रॉव्हर्सला कुलूप, खुर्च्या सोडल्यातर एक ही वस्तू बाहेर नाही, सॅम्पल कटसाठी जी फ्रेम अडकवली होती ती बघून स्वातंत्रपूर्व काळ आठवला. दुकानात एक रेडीओ होता, कदाचित जगातला पहीला रेडीओ असावा. दुकानातही कोणी नाही. आम्हाला बघून एक आजोबा रस्ता क्रॉस करुन आले. साधारण वय ७०-७५, उंची पावणे पाच – पाच फुट, थोडेशे झुकलेले, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा. दुकानची पायरी चढतानाच त्यांना माझ्या खांद्याची गरज लागली. गर्भगळीत व्हायला मला एवढं कारण पुरेसं होतं. दुकानात जाताच काका… सॉरी आजोबा म्हणाले, बोला. आता काय बोलायचं. म्हंटलं दाढी करायचीय. बसा म्हणाले. बसलो आणि माझ्यासाठी सगळं जगच स्लोमोशन मध्ये सुरु झालं. सगळ्या हलचाली हळूहळू होऊ लागल्या. थरथरत्या हातांनी ड्रॉव्हरचं कुलूप उघडलं गेलं. आतुन कात्री, कंगव्यासोबत वस्तारा बाहेर आला. झालं… त्या थरथरत्या हातातला थरथरता वस्तारा बघून माझे पाय थरथरायला लागले. अब जो होगा देखा जायेगा म्हणून सग्गळं बळ एकवटून मी डोळे मिटून बसुन राहिलो. आजपर्यंत केलेल्या सगळ्या दाढ्या आठवल्या. एकही दाढी अशी नव्हती ज्यात मला कापलं नव्हतं. कधी हनुवटी, कधी गालाच्या इथं, कधी कानाच्या इथं जरा का होईना पण कापलं होतंच. आज काय काय कापलं जाणारय याची कल्पना ही करवत नव्हती. गळा शाबूत रहावा एवढीच इच्छा. आजोबांनी तोंडावर पाण्याचा फवारा मारला आणि कापण्यापुर्वी बोकडाला पाणी पाजलं जातं हे आठवलं. ‘आजोबा, नंतर येतो. खुप महत्वाचं कामय एक. सॉरी हं…’ असं म्हणायची खुप इच्छा झाली. पण म्हणू शकत नव्हतो. मला हे ही माहीत होतं की आत्ता जर मी बोललो नाई तर खूप पश्चात्ताप करावा लागणारय. आजोबांचे थरथरते हात गालावरुन फिरत होते. ‘मिशा ठेवायच्या का?’ कापऱ्या आवाजात आजोबांनी विचारलं तसं डोळे उघडून बघितलं ‘मिशा आहेत कुठं???’ आजोबांच्या जाड भिंगाच्या चेष्म्याकडं बघितलं आणि नाई म्हणून सांगितलं. आजोबांनी क्रिम लावली, ब्रश फिरवला, चेहराभर फेस झाला. थोडावेळ काहीच घडलं नाही.
उजवा डोळा अर्धवट उघडून बघितलं तर आजोबा वस्ताऱ्यात ब्लेड घालत होते. बोंबला त्येच्या आयला. आता काय होतंय काय माहीत. अजून वेळ आहे. बाहेर नजर फिरवली तर मित्र गाडीवर बसला होता. ३ इडीयट्सचा डायलॉग आठवला ‘गाडी गेट पे थी, हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की थी, कितने आदमी थे?’ आयला.. काय चाललंय… ‘माणूस घाबरला की विचार बिथरतात’ हे त्यादिवशी कळलं. अब तुम्हारे हवाले वतन साथियों म्हंटलं आणि डोळे मिटून बसलो. कानाच्या जवळून कापरा आवाज आला, ‘हलू नका’. ‘तुम्ही पण’, असं मनात म्हंटलं. आजोबांनी दाढी करायला सुरुवात केली. पहील्यांदा उजवा गाल कापला, मग हनवटी कापली, त्यानंतर डावा गाल, दोन्ही कान, नाक, ओठ आणि शेवटी गळा. मी खुर्चीवरनं खाली कोसळलो. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलो. मित्र पळत आला, त्याच्या हातात मी कापलेली मान टाकली. ते क्रूर आजोबा ताशी एकच्या स्पिडने पळून जावू लागले. पोलिस आले, पत्रकार आले, पोलिसांनी त्या आजोबाला बेड्या ठोकल्या. दुकानात आणलं. निपचित पडलेल्या मला बघून आजोबा क्रूरपणे जोरजोरात हसू लागले. आख्या शहरात बातमी पसरली, माझ्या घरच्यांनी आक्रोश केला. आजोबा क्रूरपणे हसतच होते. आजोबाला पोलिस खेचून नेवू लागले पण आजोबा जागचे हालेनात. माझी थोडीशी हलचाल झाली तसं आजोबा हाताच्या बेड्या तोडून समोरची कात्री घेवू लागले. पोलिस त्यांना खेचू लागले. झटापटीत पाण्याच्या वाटीतलं पाणी माझ्यावर सांडलं. मी डोळे उघडले. आजोबा फवारा मारत होते. माझा चेहरा पुसला गेला. आरश्यात दोन चेहरे होते. एक चेहरा तरुण होता त्यावर कुठंही रक्ताचे डाग नव्हते. क्लिन शेव्ह केलेली. कुतुहलाने दुसऱ्या चेहऱ्याकडं बघत होता. दुसरा चेहरा स्मित हास्य करत माझ्याकडं बघत होता. मी ही एक स्माईल दिली. आजोबांनी उत्तम दाढी केली होती. अगदी हळुवार, कुठंही कापलं नाही. अफ्टर शेव्ह लावलं तरीही चरचरलं नाही. दाढी करताना डोक्यावर हात ठेवल्यानं केस विस्कटले होते ते आजोबांनी व्यवस्थित केले. मागं गेलेला शर्ट पुढं घेवून व्यवस्थित केला. नातवाच्या वयाच्या मुलाशी आदरानं बोलणाऱ्या आजोबांच्या चेहऱ्यावरच हसू फारच विलक्षण होतं. पुन: पुन्हा पाहण्यासारखं. परत सांगलीत जाईन तेव्हां आजोबांना नक्की भेटणार.

अनुभव नसताना दाखवलेल्या अविश्वासाची एक गिल्ट मनात होतीच. त्याचं प्रायश्चित्त म्हणूनच हा पोस्टप्रपंच.

“मधुकर सिताराम जाधव. वय ७६. दुकान न्यू हेअर सलून (स्थापना १९५८) पंचमुखी मारुती रोड, सांगली.”

रेडीओ १९६० चा आहे. शो पिस नसून अजुन चालू आहे. सध्याचे सगळे स्टेशन्स् त्यावर लागतात. आजोबा १९५६ पासून या व्यवसायात आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की आणि प्लिज भेट द्या.

ऋषिकेश तुराई.

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!