Home > सामाजिक > अशोक सराफ यांच्या समवेत धुमधडाका फेम “सुरेखा’ उर्फ ऐश्वर्या राणे

काल मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासच्या लिफ्ट शेजारी एक म्हातारी बसलेली दिसली. मला वाटलं, कदाचित गोंधळून म्हातारी पत्ता विसरली असेल म्हणून तिला काही मदत करता येईल यासाठी तिच्याकडे चौकशी केली. परंतु ज्यावेळी तिच्याबद्दल माहिती जाणून घेतली त्यावेळी आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण ती म्हातारी कोणी साधारण व्यक्ती नव्हती तर…. ‘धुमधडाका’ या सुपरहिट मराठी चित्रपटातील ‘वख्खा विख्खी वुख्खू” फेम
‘अशोक सराफ’ यांची प्रियत्तमा (नायिका) होती. काहीवेळ माझा विश्वास बसला नाही, म्हणून आणखी खोलात चौकशी केली, परंतु म्हातारी पण भारीच हुशार मी ‘सांगलीचा’ आहे, म्हटल्यावर ‘सांगली’ परिसरात त्यांच्या चित्रपटाचे शुटिंग झालेल्या वसंतदादा साखर कारखाना, नृसिंहवाडी भागाची खडान् खडा माहिती सांगू लागली. मध्येच फाड-फाड इंग्रजी बोलत मराठी चित्रपटांपासून पासून बॉलीवूड पर्यंत, दुबई पासून ब्रिटन पर्यंत केलेल्या प्रवासाची वर्णने मनमोकळेपणाने सांगू लागली.
“सुरेखा’ उर्फ ऐश्वर्या राणे असं त्याचं नाव….अशोक सराफ यांच्या समवेत धुमधडाका, ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांच्या समवेत ‘भटक भवानी’ या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिका म्हणून काम केले आहे. तसेच शराबी, नमक हलाल यासारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केली आहे. अमिताभ बच्चन, परबीन बाबी, निळू फुले, जयश्री गडकर यासारख्या दिग्गज कलाकारांसमवेत त्यांनी सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. परंतु दुर्दैवाने त्यांची कारकिर्द ऐन बहरात असताना अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान घोड्यावर पडून त्यांचा मोठा अपघात झाला.
यामध्ये त्यांच्या पाठीचे हाड मोडल्याने कारकिर्दीला ब्रेक लागला. त्या उपचारासाठी त्यांना मुंबईतील त्यांची संपत्ती विकावी लागली. पुढे हाती काम न राहिल्याने आणि नातेवाईकांनीही पाठ फिरविल्याने नियतीने त्यांच्यावर हालाकीची परिस्थिती आणली आहे.
खरं तर एवढी मोठी कलाकार असताना आज त्यांच्यावर शासकीय मदतीसाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजविण्य़ाची वेळ आली आहे. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती कुमकुवत झाल्याने त्या पुर्णतः हतबल झालेल्या आहेत. त्यांचा सांभाळ करणारे जवळ कोणीही नातेवाईक नाही. कोकणातील सावंतवाडी येथे भाड्याच्या घरात त्या राहतात. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने C ग्रेड कलाकारांना मिळणारी पेन्शन मिळते. चार दिवसापुर्वी त्या हयात आहेत का ? याची माहिती घेण्यासाठी त्यांना मंत्रालयातून फोन आला होता. आपली पेन्शन बंद होईल या भितीने, आपण अजून हयात आहोत हे सांगण्यासाठी त्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटायला आल्या होत्या. वास्तविक A ग्रेड कलाकारांना असणारी २१०० रुपये पेन्शन मिळावी अशी त्यांची मागणी आहे, परंतु सरकारने त्यांना C ग्रेड कलाकारांना दिली जाणारी १५०० रुपये पेन्शन दिली आहे. त्यामुळे A ग्रेडची पेन्शन मिळावी म्हणून त्या सरकारकडे हेलपाटे मारत आहेत. या व्यतिरिक्त त्यांना संजय गांधी निराधार योजनेची ६०० रुपये पेन्शन मिळते,परंतु या अल्प पेन्शनवर त्यांचा उदर्निवाह चालत नाही. सरकारमधील एका मंत्र्याने गेल्यावर्षी त्यांची ही पेन्शन एक हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

ग्लॅमरची रंगेरी दुनिया म्हणून फिल्म इंडस्ट्रीकडे पाहिले जाते, या रंगेरी दुनियेच्या नादाने अनेक कलाकार मुंबईच्या दिशेने ओढले जातात. परंतु या पडद्यावरील आभासी दुनियेत ग्लॅमर घेऊन वावरणाऱ्या कलाकारांचे पदड्यामागील आयुष्य मात्र किती भयंकर आहे याचे वास्तव उदाहरण सुरेखा राणे यांच्या निमित्ताने पहायला मिळाले..खरं तर आज शासनाने आणि समाजातील चांगल्या लोकांनी या ज्येष्ठ अभिनेत्रीला मदत करण्याची गरज आहे जेणे करुन त्यांचे उर्वरित आयुष्य समाधानाचे जावू शकेल😔.

( 8605988321 हा मोबाईल क्रमांक सुरेखा राणे यांचा आहे. जर कोणास त्यांना सढळ हाताने मदत करायची असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क करु शकता )

POST By – Abhijit V Zambre

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!