Home > सामाजिक > ओन्नर किलो नूर; केवळ दोन मल्याळम शब्द विझवताहेत शेतकऱ्यांच्या पोटाची आग

ओन्नर किलो नूर; केवळ दोन मल्याळम शब्द विझवताहेत शेतकऱ्यांच्या पोटाची आग

आज साडेपाच च्या सुमारास काहीतरी किरकोळ खरेदी करायची म्हणून आज पत्नीसोबत गाडी घेऊन बाहेर पडलो. पहिल्यांदा हेल्मेट घ्यायचे म्हणून पयन्नूर शेजारी असलेल्या हायवेपपर्यंत १० किलोमीटर अंतरावर फेरपटका मारला पण रविवार असल्याने सर्व दुकाने बंद होती हे नंतर लक्षात आले. एवढ्या दूर जाऊन देखिल हाती काहीच लागले नाही त्यामुळे थोडसं वाइट वाटलं पण मग आता काय करायचं असा विचार डोक्यात आला आणि आल्यासारखं काहीतरी घेऊन जायचे म्हणून जवळच असलेल्या फळांच्या मार्केटमधून संत्री, सफरचंद आणि द्राक्षे खरेदी केली. डाळिंबाचा भाव विचारला तर १२० रू किलो असल्याचे सांगितले खरंतर आमच्या घरी डाळिंबाची बाग असून इथे एवढे पैसे मोजावे लागताहेत हा विचार केला आणि डाळिंब न घेताच परतीच्या दिशेने शहरातून घराकडे निघालो असतानाच हायवे पासून काही अंतरावरं पेट्रोलपंपाशेजारी एक डाळिंब विक्रेता रस्त्याच्या बाजूलाच डाळिंब विकत बसलेला दिसला. गावाकडच्या आमच्या डाळिंबाच्या बागेतील भगव्या डाळिंबाची आठवण झाली म्हणून पत्नीला म्हणालो डाळिंब घेऊया. सौभाग्यवती गाडीवरून खाली उतरली आणि डाळिंबवाल्याला विचारले… (मल्याळम भाषा तोंडी नसल्यामुळे तिने सुरवातीला हिंदीतूनच संभाषण केले).
सौभाग्यवतती : कितने का है? (हिंदी)
डाळिंबवाला : ओन्नर किलो नूर (मल्याळम)
सौ : क्या?
डाळिंबवाला : ओन्नर किलो नूर
सौ : हिंदी मे बोलो
(तेवढ्यात सौभाग्यवतीने मला आवाज दिला अहो इकडे या ना)
गाडी थोडी पुढे घेऊन रस्त्याच्या बाजूला पार्क करून निघालो. परंतू सौभाग्यवतीची मराठी भाषा ऐकून डाळिंबवाल्याने सौ.ला विचारले की तुम्ही मराठी आहात का?
सौ.ने हो म्हंटले
डाळिंबवाला : कुठलं तुम्ही?
सौ.: सांगली
डाळिंबवाला : मी पण सांगलीचा आहे. तुम्ही सांगलीत कुठलं?
सौ.: आटपाडी
डाळिंबवाला : आटपाडीत कुठलं?
सौ.: अनुसेवाडी (निंबवडे)
डाळिंबवाला : मी करगणीचा आहे.
तेवढ्यात मी पोहचलो डाळिंबवाल्याचा चेहरा जरा गावाकडचा वाटला म्हणून मी विचराले तेव्हा तो म्हणाला आम्ही करगणीचे सरगर आहोत.
मग मी म्हंटलं अहो मग तुम्ही आमचेच पाहुणे आहात की…
आपल्या तालुक्यातला आटपाडीतला आपला माणदेशी माणूस डाळिंब विकायला केरळ मध्ये आला आहे हे पाहून मला खरंतर कुतूहल वाटले. म्हणून उत्सूकतेपोटी विचारू लागलो तुम्ही इकडे कसे काय आणि तुम्ही राहता कुठे?
तेव्हा ते डाळिंब बागायतदार असलेला मुरलीधर सरगर नावाचा शेतकरी म्हणाला की आम्ही दोन दिवसांसाठीच सर्व मिळून दहा जण पिकअप भरून आलो आहोत आणि गाडीमध्येच राहतो एक दिवस आमचा मुक्काम इथे पडतो आणि सर्व डाळिंब विकले की आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी गावाकडे निघून जातो.
तुम्ही इथे कसे काय? दुकान वगैरे काही बिजनेस आहे का? असे मला त्यांनी विचारल्यावर मी म्हणालो नाही मी इथे माझ्या कामानिमीत्त असतो. मग मी त्यांना म्हणालो की इकडे डाळिंब खूप महाग असतात १२० रू किलोपर्यंत भाव असतो. गावाकडे बाग असून देखिल इकडे महागाची डाळिंब खरेदी करावी लागतात. तुम्ही इथे किती रूपयाला डाळिंब विकतां असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की १०० रूपयाला दीड किलो.
डाळिंब खरेदी करण्यासाठी माणसांची गर्दी भरपूर वाढत होती. प्रत्येकजन मल्याळम मध्येच विचारत होता तेव्हा आपले मुरलीधर सरगर सांगायचे की “वन्नर किलो नूर”(दीड किलो शंभर रूपयाला). आमचं बोलणं चालूच होतं ग्राहकांची गर्दी काही कमी होत नव्हती त्यामुळे जास्त बोलणं शक्य नव्हतं. परंतू प्रत्येक ग्राहकांना उत्तर देताना मुरलीधर सरगर उत्तर द्यायचे की “वन्नर किलो नूर” (दीड किलो शंभर रूपयाला). यावरती माझ्या सौभाग्यवतीने विचारले की तुम्ही इकडची सगळी भाषा शिकलात का? त्यावर ते म्हणाले नाही फक्त एवढे तीनच शब्द शिकलोय ते पण आपला माल खपवायला तेवढं शिकावंच लागतंय.
माझ्या डोक्यातील विचारचक्र गरगरगर फिरायला सुरू झाली. एकीकडे आमच्या माणदेशातील डाळिंबांना ३०-३५ रू किलोच्या वरती भाव मिळत नाही. लाखो रूपये खर्च करून देखिल डाळिंबाच्या कळ्या फळ निघायच्या आतच गळून जातात. शेतकरी हतबल होतो हातपाय गाळून बसतो त्यातूनही जर डाळिंबाची उत्पन्न निघाले तर व्यापारी ३०-३५ रूपयेच्या वरती मालाला किंमत देत नाही. स्वखर्चाने कुठे बाहेर घेऊन जायचे म्हंटले तर गाडी भाडे परवडत नाही. जर असाच डाळिंबाला दर मिळाला तर साधा फवारणीचा खर्च देखिल निघत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो अशी एक ना अनेक उदाहरणे मी आटपाडी तसेच सांगोला तालुक्यात डोळ्याने पाहिली आहेत मग शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
केरळ मध्ये डाळिंबाचे दर शंभर रूपये किलो च्या वरतीच असतात. मागच्या दोन आठवड्यापूर्वी १२० रूपये किलो डाळिंबाला भाव केरळ मध्ये होता मात्र शेतकऱ्यांकडून ते व्यापारी ३०-३५ रूपयांत घेऊन इकडे १०० रू च्या वरती भावाने विकतात आणि यामध्येच शेतकरी नागवला जातो आणि व्यापारी मात्र मालामाल होतो. त्यातच मुरलीधर सरगर आणि त्याच्या साथीदारांच्या हिंमतीला दादच द्यायला हवी. कोणत्याही व्यापाऱ्याला मध्यस्थी न करता १०० रूपयांत दीड किलो या दराने डाळिंब विकल्याने ग्राहकांना देखिल डाळिंब विकत घ्यायला काहीच वाटत नाही आणि गावकडच्या दरापेक्षा जवळजवळ दुपटीने माल विकत असल्याने शेतकऱ्याला देखिल काहीच वाटत नाही. शिवाय गाडीचे भाडे म्हंटले तर ते दहा जणांमध्ये द्यायला देखिल जास्त खर्च येत नाही. केवळ “वन्नर किलो नूर” या केरळमधल्या दोन मल्याळम शब्दामुळे माझ्या माणदेशातल्या शेतकऱ्यांच्या पोटाचा, जीवनाचा प्रश्न सुटतोय. कशाचीही तमा नसताना, भाषा येत नाही म्हणून कोणतीही लाज न बाळगता घाम गाळून शेतामध्ये पिकवलेली डाळिंब विकण्यासाठी पयन्नूर येथे आलेल्या मुरलीधर सरगर आणि त्यांच्या इतर साथीदारांना माझ्याकडून मानाचा जय मल्हार. म्हणून शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की जर कोणी व्यापारी तुमच्या मालाला किंमत देत नसेल तर समजा तो तुमच्या गाळलेल्या घामाला किंमत देत नाही अशा वेळी लाखों रुपयांचे नुकसान करून सोन्यासारखा पिकवलेला माल व्यापाऱ्यांच्या घशात घालू नका. शेतकऱ्यांची एक अशी फळी तयार करून मैसूर(कर्नाटक), बैंगलोर(कर्नाटक), कोचीन(केरळ), कन्नूर(केरळ), चेन्नई (तमिळनाडू), कोइंमतूर(तमिळनाडू) अशा एक ना अनेक छोट्या-मोठ्या शहरात तुम्ही घाम गाळून पिकवलेला माल सोन्याच्या भावात विकू शकता. त्यामुळे शेतकऱ्यांनी हताश न होता, कोणावर अवलंबून न राहता पुन्हा स्वताच्या हिमतीने स्वताच्या कष्टांचे चीज करा.
जय मल्हार!! जय अहिल्या!! जय यशवंत!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.in

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!